बुधवार, १४ मे, २०२५

11वी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन







10 वी चा निकाल लागल्यानंतर पुढच्या प्रवेश प्रक्रियेसाठो विद्यार्थी व पालक यांची धावपळ सुरू होते. आपल्या मुलांना चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळावा म्हणून सर्वच पालक प्रयत्न शील असतात. आता राज्यभरात 11 वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेची सुरवात 19 मे पासून होणार असून, 11 वीचे वर्ग 19 ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत.


शाळा-महाविद्यालयाना कसे होता येणार या प्रक्रियेत सामील -

शासन मान्यताप्राप्त, अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यीत, अंशता अनुदानित या सर्व प्रकारच्या शाळा व महाविद्यालयांना या प्रक्रियेत सामील होता येणार असून, यासाठी यांना 15 मे पर्यंत शिक्षण विभागाच्या वेबसाईट वर नोंदणी करावी लागणार आहे.


विद्यार्थ्याना कधी आणि कशी करावी लागणार प्रक्रिया -


10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 19 मे पासून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरता येणार आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज भरताना 10 पसंती क्रमांक द्यावे लागणार आहेत. त्यानंतर 28 मे पर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहील. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या एकूण चार फेऱ्या होतील, तर, पाचवी फेरी खुल्या पद्धतीने गुणवत्तेनुसार राबवली जाईल. मात्र, अद्याप यासाठी तारखा जाहीर झालेल्या नाहीत.


11 वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2025-26 संदर्भात


महत्त्वाचे मुद्दे


माहिती भाग 1


1) ऑनलाइन वेळापत्रक संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी एकच असेल.


2) विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सर्व कॉलेज व त्या कॉलेजमधील सर्व शाखांची माहिती मिळेल तसेच संबंधित कॉलेजमध्ये उपलब्ध विषयाची माहिती मिळेल.


3) विद्यार्थ्याला फक्त एकच अर्ज ऑनलाईन भरावा लागेल. त्यात तो दहा कॉलेजचे नावे पसंती क्रमानुसार प्रवेशासाठी टाकू शकतो. कमीत कमी एक कॉलेज व जास्तीत जास्त दहा कॉलेजची नावे टाकता येतील.


4) https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर विद्यार्थी स्वतःच्या मोबाईलवरून अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरू शकेल. संगणकावर देखील अर्ज भरता येतील.


5) विद्यार्थ्यांना किंवा पालकांना अकरावी प्रवेशा संदर्भातील माहिती पुस्तिका डाऊनलोड करता येईल. ती संपूर्ण वाचून अर्ज भरावा.


6) विद्यार्थी वैयक्तिक माहिती नाव, पत्ता तसेच मागील शाळेची माहिती, दहावीचे विषय त्यांचे माध्यम, जात, संवर्ग, क्रीडा स्पर्धा व दिव्यांग असेल तर ती माहिती भरावी.


7) विद्यार्थ्यांनी आपले आवश्यक्य कागदपत्रे अपलोड करावयाचे आहेत. ते व्हेरिफाइड करूनच कॉलेज विद्यार्थ्यांचा प्रवेश निकषाच्या आधारे निश्चित करेल.


8) अर्जातील भाग एक परिपूर्ण भरून लॉक / प्रमाणित करण्यासाठी दहावीच्या शाळेत किंवा एखादे उपलब्ध मार्गदर्शन केंद्र निवडा. तेथे व्हेरिफिकेशन केले जाईल. भाग एकच्या डॅशबोर्डवर व्हेरिफाइड असणे आवश्यक आहे. असे नसल्यास असे अर्ज प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.


9) भाग एक मधील माहितीची दुरुस्ती दहावीच्या शाळेतून किंवा मार्गदर्शन केंद्रातून करता येईल. अर्जाची प्रिंट काढावी.


10) विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज सादर केल्या बाबतची पोच पावती म्हणून SMS मिळेल.


11) सर्व विद्यार्थ्यांना सर्व कॉलेजचा गुणांचा कट ऑफ पाहता येईल.


माहिती भाग 2


1) अकरावीला कोणत्याही प्रकारे ऑफलाइन प्रवेश होणार नाहीत. घेतल्यास कार्यवाही होईल. असे घेतलेले प्रवेश संच मान्यतेसाठी व बोर्ड फॉर्म भरण्यासाठी पात्र राहणार नाही.


2) https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर


अकरावी प्रवेश फॉर्म भरता येईल.


3) विद्यार्थ्यांचा दहावीचा सीट नंबर हा त्याचा लॉगिन आयडी राहील. तो ओपन केल्यानंतर Get Data बटनावर क्लिक करून विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षेच्या संदर्भातील माहिती मिळेल. ती व्हेरिफाइड करावी लागेल.


4) प्रवेश अर्जाचा पहिला भाग व्हेरिफाइड झाल्यावरच अर्जाच्या भाग दोन मधील पसंतीक्रम व इतर माहिती भरता येईल. यात बेस्ट ऑफ फाईव्ह (best of five) चे विद्यार्थ्यांचे गुण व शेकडा गुण आपोआप दिसतील.


5) परंतु इतर मंडळाच्या CBSE / ICSE किंवा इतर राज्यातील विद्यार्थ्यांना गुण स्वतः भरावे लागतील. यात IT सारखे विषय वगळून उरलेल्या विषयाचे गुण भरावे लागतील.


6) ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 100 रुपये नोंदणी शुल्क विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने भरतील. ही रक्कम शासनाला मिळेल.


7) विद्यार्थ्यांचे जर मेरिट यादीनुसार लागलेल्या कॉलेजला राऊंडमध्ये दिलेल्या तारखांना प्रवेश घेतला नाही तर त्यास राऊंड 3 पर्यंत कुठेही प्रवेश घेता येणार नाही. मात्र अतिरिक्त विशेष फेरीमध्ये त्याला प्रवेश घेता येईल. त्यावेळी त्या कॉलेजच्या जागा शिल्लक असल्या पाहिजेत, नसेल तर अन्य कॉलेज निवडावे लागेल.


8) भरलेला ऑनलाइन अर्ज व्हेरिफाइड करणे, डॅशबोर्ड तपासणी अत्यावश्यक्य आहे. त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.


9) विद्यार्थी राऊंड चार पर्यंत घेतलेली शाखा मिरीट नुसार बदलू शकतो.


10) विद्यार्थी प्रत्येक राऊंडला कॉलेजचा पसंतीक्रम बदलू शकतो. (पहिल्या वेळेस एकापेक्षा जास्त कॉलेज घेतले असणे आवश्यक


11) एका मोबाईल / संगणकावर एकच ऑनलाईन अर्ज भरता येईल अशी सूचना आहे.


12) चार राऊंड झाल्यावर अकरावी कॉलेज अध्ययन कामकाज सुरू होईल.


माहिती भाग 3


1) Zero Round कोटा प्रवेश इन हाऊस व मॅनेजमेंट कोटा व इतर कोटा प्रमाणे प्रवेश होतील.


2) R1, R2, R3 राउंड (तीन प्रवेश फेऱ्या) गुणवत्ता., प्राधान्यक्रम. व. आरक्षण, धोरणानुसार प्रवेश होतील.


3) अतिरिक्त विशेष फेरी प्रवेश न मिळालेल्या सर्वांसाठी खुली, गुणवत्ता व प्राधान्यक्रम यानुसार प्रवेश फेरी (Open to All) राहील. यात उर्वरित सर्व प्रवेश तसेच ATKT चे प्रवेश होतील. तेथे आरक्षण लागू राहणार नाही.


आवश्यक्य कागदपत्रे -


1) दहावीच्या परीक्षेचे मूळ गुणपत्रक


2) दहावीच्या वर्गातून शाळा सोडल्याचा दाखला


3) आधार कार्ड (छायांकित प्रत)


4) दोन पासपोर्ट साईज फोटो


5) सामाजिक आरक्षणातून प्रवेश घेणाऱ्यांना जात प्रमाणपत्र उत्पन्न दाखला


<






सोमवार, २१ एप्रिल, २०२५

*लिपिड प्रोफाइल - सुंदर स्पष्टीकरण

*लिपिड प्रोफाइल - सुंदर स्पष्टीकरण*

एक प्रसिद्ध डॉक्टरने *लिपिड प्रोफाइल* समजावण्यासाठी एक अप्रतिम गोष्ट सांगितली.  

*कल्पना करा की, आपले शरीर एक छोटेसे गाव आहे.*
या गावातील मुख्य उपद्रवी घटक म्हणजे *कोलेस्टेरॉल.*
याला मदत करणारा प्रमुख साथीदार म्हणजे *ट्रायग्लिसराइड.*
त्यांचे काम गावाच्या रस्त्यांवर फिरणे, अडथळे निर्माण करणे आणि वाहतूक खोळंबा करणे आहे.  

*या गावाचे केंद्र म्हणजे आपले हृदय.* सर्व रस्ते हृदयाकडे जातात. जेव्हा या उपद्रवी घटकांची संख्या वाढते, तेव्हा ते *हृदयाच्या कार्यात अडथळा निर्माण करतात.* 

परंतु गावात *पोलीस फोर्स* देखील आहे. *एचडीएल (HDL)* हा *सद्भावना पोलीस* आहे, जो या उपद्रवी घटकांना पकडतो आणि *यकृतात* (liver) टाकतो, जे नंतर त्यांना शरीरातून बाहेर टाकते.  

पण गावात एक *वाईट पोलीस एलडीएल (LDL)* देखील आहे. एलडीएल हा *सत्तेचा हव्यास असलेला अधिकारी आहे,* जो *उपद्रवी घटकांना सोडवतो आणि पुन्हा रस्त्यावर पाठवतो.*

जर *एचडीएल (सद्भावना पोलीस)* कमी असतील आणि *एलडीएल (वाईट पोलीस)* जास्त असतील, तर गावात *अराजकता पसरते* आणि *हृदयविकाराचा धोका वाढतो.*

मग यावर उपाय काय?  
*उपद्रवी घटक कमी करायचे आणि चांगल्या पोलिसांची संख्या वाढवायची?* 

*चालायला सुरुवात करा! प्रत्येक पावलाने चांगल्या पोलिसांची संख्या (HDL) वाढेल आणि वाईट पोलीस (LDL) व उपद्रवी घटक (कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड) कमी होतील.* त्यामुळे *आपले गाव (शरीर) निरोगी होईल आणि हृदय मजबूत राहील!*

*त्यामुळे चालत राहा, चालत राहा आणि चालत राहा!*  
*हॅपी सीनियर सिटीझन्स वीक!*

*काय कमी करावे?* 
१. *मीठ,* 
२. *साखर,*  
३. *पांढरा मैदा*,  
४. *दुग्धजन्य पदार्थ,* 
५. *प्रक्रिया केलेले अन्न.*

*कोणते अन्न खावे?*  
१. *भाजीपाला,*
२. *कडधान्ये,*  
३. *शेंगा,*  
४. *सुकामेवा,*  
५. *थंड दाबलेले तेल,* *(ऑलिव्ह, नारळ)*  
६. *फळे.*

*ही तीन गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करा :*
१. *आपले वय,* 
२. *आपला भूतकाळ,*  
३. *आपल्या तक्रारी.* 

*या गोष्टी आवर्जून जपा :*  
१. *आपले कुटुंब,* 
२. *आपले मित्र,*
३. *आपले सकारात्मक विचार,*  
४. *स्वच्छ व आनंदी घर.*

*या तीन गोष्टी अंगीकारा :*  
१. *नेहमी हसत राहा,* 
२. *नियमित शारीरिक हालचाल करा,* 
३. *वजनावर नियंत्रण ठेवा.* 

*सहा जीवनशैली सवयी ज्या पाळल्या पाहिजेत :* 
१. *तहान लागेपर्यंत थांबू नका, नियमित पाणी प्या.* 
२. *दमल्यावरच विश्रांती घेऊ नका, वेळच्या वेळी आराम करा.* 
३. *आजारी पडल्यावरच डॉक्टरकडे जाऊ नका, नियमित तपासणी करा.*
४. *चमत्काराच्या प्रतीक्षेत राहू नका.*
५. *स्वतःवर विश्वास ठेवा.*  
६. *नेहमी सकारात्मक राहा आणि उज्ज्वल भविष्याचा विचार करा.* 

*आपल्याकडे ४७ ते ९० वयोगटातील मित्र आहेत का?* तर *हा संदेश त्यांना जरूर पाठवा!*

🌹हॅपी सीनियर सिटीझन्स वीक!🎉
*सर्वांना निरोगी आणि आनंदी जीवनाच्या शुभेच्छा!*
🙏🙏🙏🙏

रविवार, २० एप्रिल, २०२५

बुद्धिबळाचे वेगळे संच, पट.. बरीच वेगळी माहिती

बुद्धिबळाचे वेगळे संच, पट.. बरीच वेगळी माहिती ! 

बुद्धिबळ हा भारतात रुजलेला, जनसामान्यांपर्यंत पोचलेला फार जुना खेळ आहे. याची किमान माहिती बहुतेक सर्वांना असतेच. जगभर पसरलेला हा खेळ मूळचा भारतीय आहे. पायदळ, हत्ती, घोडे, ऊंट अशी चतुरंग सेना फक्त भारतात वापरली जात होती. चतुरंग, चतरंग, शतरंग, शतरंज हा जसा प्रवास आहे तसाच जुना फ्रेंच शब्द एसचेस ( esches ), चेक्स ( चौकोन ), चेस हा प्रवासही आहे. बुद्धिबळाचा प्रथम उल्लेख इसवी सन पूर्व ५०० मध्ये ब्रह्मजाल सूत्र या ग्रंथात आढळतो. या खेळाचे जगभर पोचणे, त्याचे नियम व त्यात वेळोवेळी झालेले बदल, त्याचे विविध संघ आणि संघटना, स्पर्धा असा याचा प्रवास झाला. त्यात वेळोवेळी कांही स्थानिक बदल झाले. शिआंकी हे चिनी बुद्धिबळ २ हत्ती, २ घोडे, २ ऊंट, २ वझीर, १ राजा, ५ प्यादी आणि २ तोफा यांच्या आधारे खेळले जाते. 

संगीत ज्याप्रमाणे स्वरलिपीत लिहिले जाते तसेच बुद्धिबळाचे विविध खेळ, चाली सुद्धा लिहिल्या जाऊ लागल्या. त्यामुळे यावरील ग्रंथ आणि नियतकालिके मोठ्या संख्येने प्रसिद्ध होऊ लागली. मध्यंतरी जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन स्पर्धेत  फक्त रशियन किंवा अमेरिकन  जिंकायचे असा अलिखित नियम झाला होता. विश्वनाथन आनंद, डी. गुकेश यांच्या दणदणीत विजयानंतर या खेळाचा मूळ शोधकर्ता देश असलेल्या भारताचा दबदबा निर्माण झाला आहे.

बुद्धिबळ म्हणजे पुरुषांची मक्तेदारी असा प्रवाह रुजला होता. तेव्हा विविध क्लब हे कॉफी हाऊस, मद्यपान गृहे यांच्याशी जोडलेले होते. साहजिकच तेथे पुरुषांचे राज्य असे. तेथे बुद्धिबळ खेळणे म्हणजे स्त्रियांना अलिखित बंदीच ! १८४७ मध्ये नेदर्लंडमध्ये स्त्रियांसाठी पहिला बुद्धिबळ क्लब स्थापन झाला. १८६० मध्ये एच.आय.कुक या महिलेने बुद्धिबळावर लिहिलेले पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले. त्याच्या १० आवृत्या निघाल्या. १८८४ मध्ये ससेक्समध्ये पहिली महिला बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली गेली. आज कोनेरू हंपी ही भारतीय महिला या खेळात चमकते आहे. आता या सर्वांच्या पलीकडे जाऊन १९९७ मध्ये संगणकाने मानवी जगज्जेत्याला हरवून एका वेगळ्याच डावाला सुरुवात केली आहे.  
    
बुद्धिबळ खेळाशी निगडित अशी एक अत्यंत मनोरंजक गोष्ट आहे. बुद्धिबळ खेळातील प्रावीण्याबद्दल एका हुशार पण गरीब माणसाने राजाकडे वेगळेच दान मागितले होते. पटावरील  पहिल्या घरात गव्हाचा १ दाणा, दुसऱ्यात २, तिसऱ्यात ४, चौथ्यात ८, पाचव्यात १६, सहाव्यात ३२ असे ६४ घरे पूर्ण करीत जायचे. मग त्या सर्व ६४ घरांमध्ये जमा झालेले धान्य या खेळाडूला दान म्हणून देण्याचे राजाने मान्य केले. पूर्वी याचा हिशेब मांडणेही फार कठीण होते. पण आज आधुनिक संगणकावर ६४ या एकाच घरातील दाण्यांची संख्या ९२,२३,३७,२०,३६,८५,४७,८०,००० इतकी प्रचंड येते. त्या आधीच्या म्हणजे ६३ व्या घरात ४६,११,६८,६०,१८,४२,७३,९०,००० तर ६२ व्या
घरात २३,०५,८४,३०,०९,३१,३६,९०,००० ही संख्या आहे. अशी सर्व ६४ घरांमधील संख्यांची बेरीज पूर्ण करण्यासाठी त्या राजाला वर्षाकाठी पिकणारे सर्व धान्य,कित्येक पिढ्या द्यावे लागेल. ही कल्पना, हिशेब, सकृत दर्शनी त्याचा न जाणवणारा आवाका हे सारेच अचंबित करणारे आहे, बुद्धिबळ हे नाव सार्थ करणारे आहे. मी स्वतः ५० ग्रॅम गव्हाचे दाणे मोजले ते ९५० भरले. म्हणजे एक किलोमध्ये सुमारे १९००० दाणे होतात. आता या सर्व संख्या वाचल्यावर अन्य सर्व गोष्टी आपल्या तर्कावर सोडाव्यात हेच चांगले नाही का ? 

माझ्या संग्रहात अनेक बुद्धिबळ संच आहेत. सोबत त्यातील कांही वेगळे पट व संच यांची छायाचित्रे देत आहे. यात एक राजेशाही सोंगट्या आणि भरजरी पट आहे. विशेष प्रकारची संच ठेवण्याची पेटी, बटवे आहेत. संपूर्ण कांचेच्या, दगडाच्या सोंगट्या असलेले संच आहेत. 

थोडी अधिक माहिती म्हणजे बुद्धिबळ हा खेळ एकाचवेळी ३, ४, ५ किंवा ६ खेळाडूही खेळू शकतात. चौरस आकाराच्या पटाबरोबरच बुद्धिबळाचे गोल आकाराचे पट सुद्धा उपलब्ध आहेत. हे सर्व विशेष प्रकारचे पट आणि सोंगट्या यांची छायाचित्रे नेट / गुगलच्या सौजन्याने सोबत दिली आहेत. 

हे सर्व वाचल्यावर आपल्या बुद्धीला बळ देण्यापेक्षा, हे मनोरंजक वाटले का, नवीन कांही कळले का, हे नक्की बघा ! 
© ( हा लेख व सोबतचे फोटो शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावेत ).
***** मकरंद करंदीकर.
makarandsk@gmail.com

मंगळवार, १५ एप्रिल, २०२५

सापशिडी खेळ इतिहास

१३ व्या शतकात, भारतीय कवी आणि संत ज्ञानदेव यांनी मोक्ष पटम नावाचा मुलांचा खेळ तयार केला. नंतर ब्रिटिशांनी मूळ मोक्ष पटम ठेवण्याऐवजी त्याला साप आणि शिडी असे नाव दिले.सुरुवातीला, मुलांना नैतिक शिक्षण देण्यासाठी हा खेळ वापरला जात असे. ज्या चौकांमध्ये शिडी सुरू होतात ते प्रत्येक चौक सद्गुणाचे प्रतीक होते आणि सापाचे डोके असलेले चौक वाईटाचे प्रतीक होते. मूळ हिंदू खेळात सापांची संख्या शिडींपेक्षा जास्त होती. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात वसाहतवादी शासकांनी काही बदल करून हा खेळ इंग्लंडला नेला.मूळ खेळात, 'शंभर चौरस खेळ बोर्ड', १२ वा चौरस श्रद्धा, ५१ वा चौरस विश्वसनीयता, ५७ वा चौरस उदारता, ७६ वा चौरस ज्ञान आणि ७८ वा चौरस तपस्वीपणा होता. हे असे चौक होते जिथे शिडी सापडत होत्या आणि माणूस वेगाने पुढे जाऊ शकत होता. ४१ वा चौरस अवज्ञासाठी, ४४ वा चौरस अहंकारासाठी, ४९ वा चौरस अश्लीलतेसाठी, ५२ वा चौरस चोरीसाठी, ५८ वा चौरस खोटे बोलण्यासाठी, ६२ वा चौरस मद्यपानासाठी, ६९ वा चौरस कर्जासाठी, ८४ वा चौरस क्रोधासाठी, ९२ वा चौरस लोभासाठी, ९५ वा चौरस अभिमानासाठी, ७३ वा चौरस खूनासाठी आणि ९९ वा चौरस वासनेसाठी होता. हे असे चौरस होते जिथे साप तोंड उघडे ठेवून वाट पाहत असे.१०० वा चौरस निर्वाण किंवा मोक्षाचे प्रतिनिधित्व करत असे. प्रत्येक शिडीच्या वरच्या भागात देवाचे किंवा विविध स्वर्गांपैकी एकाचे (कैलास, वैकुंठ, ब्रह्मलोक) चित्रण केले जात असे. खेळ जसजसा पुढे जात होता तसतसे जीवनाप्रमाणेच विविध क्रिया तुम्हाला बोर्डवर वर आणि खाली घेऊन जात असत.. चांगल्या कर्मांचे आणि वाईट कर्मांचे परिणाम शिकवण्यासाठी हा खेळ एक साधन म्हणून अर्थ लावला जात होता आणि वापरला जात होता.हा खेळ प्राचीन भारतात लोकप्रिय होता.  हे पारंपारिक सनातन तत्वज्ञानाशी देखील संबंधित होते जे कर्म आणि काम, किंवा नशीब आणि इच्छा यांच्यातील फरक दर्शवते. त्यात नशिबावर भर देण्यात आला होता, पचिसी सारख्या खेळांच्या विरोधात, जे कौशल्य आणि नशीब यांचे मिश्रण म्हणून जीवनावर लक्ष केंद्रित करतात. खेळाच्या मूलभूत आदर्शांनी १८९२ मध्ये व्हिक्टोरियन इंग्लंडमध्ये सादर केलेल्या आवृत्तीला प्रेरणा दिली.सुधारित खेळाला साप आणि शिडी असे नाव देण्यात आले आणि त्यातील नैतिक आणि धार्मिक पैलू काढून टाकण्यात आले आणि शिडी आणि सापांची संख्या समान करण्यात आली. १९४३ मध्ये, हा खेळ अमेरिकेत चुट्स आणि शिडी या नावाने सादर करण्यात आला

सोमवार, २४ मार्च, २०२५

*फिरुनी नवे जन्मेन मी*
27 मार्च 2016ला केरळ एक्सप्रेसमध्ये दिल्लीहून सकाळी अकरा वाजता बसलो. आवडती साईड लोवर विंडो सीट मिळाली होती. गाडी झांशी शहराबाहेर काही मिनिटांसाठी थांबली. समोर उंचावर झांशीचा किल्ला खिडकीतून दृष्टीसमोर होता. खिडकीच्या बाहेर रुळांजवळ छोटंसं तळं होतं. सूर्यास्त व्हायला पाऊण एक तास बाकी असेल. सूर्य झांशीच्या किल्ल्याच्या मागे दडत होता. त्या पिवळ्या केशरी प्रकाशात, ग पाण्याच्या मागे किल्ला अंधारात राकट काळा दिसत होता.

त्या दिवशी वर्ल्डकपमधील सेमी फायनल , भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया डू ऑर डाय मॅच होती. एरवी मी मॅचचे अपडेट्स घेत बसलो असतो. पण माझ्या डोक्यात तेव्हा वेगळे विचार सुरू होते.

इतर कोणत्याही दिवशी समोर किल्ला दिसत असता तर मी मनाने, कल्पनेने राणी लक्ष्मीबाईने किल्ल्यावरून कशी अश्वउडी घेतली असेल याची कल्पना मी करत राहिलो असतो. पण त्या दिवशी झांशीच्या किल्ल्याकडे बघताना एका वेगळ्याच ‘व्यक्तीची’ आठवण मला येत होती. त्याच व्यक्तिबद्दल माझ्या मनात आदल्या दिवशीपासून विचार सुरू होते. मित्राला 'त्या' व्यक्तीबद्दल एक वाक्य ही बोललो होतो..आणि काय आश्चर्य डोळ्यासमोर तेव्हा झांशीचा किल्ला होता. गाडी थांबलेलीच होती.

डोळ्यासमोर व्यक्ती येत होती ती “अरुणिमा सिन्हा”.

23 वर्षाची ही नॅशनल व्हॉलीबॉल खेळाडू मुलगी 12 एप्रिल 2011ला घरून दिल्लीला नोकरीच्या मुलखतीसाठी निघाली. सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन घरातून निघताना तिच्या घरच्यांना किंवा तिलाही कल्पना नव्हती नियतीने तिच्यापुढे काय वाढून ठेवलंय.

लखनऊहुन ती पद्मावती एक्सप्रेसमध्ये जनरल डब्यात चढली. रात्री डब्यात काही तरुण हातात चाकू घेऊन डब्यात घुसले. सगळयांना धमकावून जे मिळेल ते लुटू लागले. कोणत्याही प्रवाशाने विरोध केला नाही.

तिच्या गळ्यात सोन्याची चेन होती.
ते दरोडेखोर तिच्याजवळ आलेत. एकाने तिला चेन देण्यासाठी दरडावले. दुसरा तिच्या गळ्यापाशी हात नेऊ लागला.

तीने विरोध केला. ती म्हणाली ,”मैं अपनी चेन नही दुंगी!”

ती विरोध करू लागली. एकाने तिच्या पोटावर लाथ मारली. तिच्या गळ्यातील चेन ओढून घेतली. पण ते पिसाळले होते. कोणीही विरोध करत नसताना एक मुलगी आपल्याला विरोध करतेय हे त्यांना पचलं नाही. ट्रेन भरधाव सुरू होती. त्या नीच उलट्या काळजाच्या लोकांनी तिला ओढत दरवाज्यापाशी नेले आणि भरधाव वेगातील रेल्वेतुन बाहेर ढकलून दिले.

रात्रीची वेळ..ती जोराने आदळली. कंबरेपासून पायाचे हाड मोडलेत. चेहऱ्यावर जखमा..ती जिथे आदळली त्याला लागून दुसरा रेल्वेमार्ग होता. दुसऱ्या ट्रॅकवरील रुळांवर तिचा पाय होता. तिने उठायचा प्रयत्न केला. पण ती उठू शकली नाही. पाय हलत नव्हता. समोरून एक रेल्वे त्याच ट्रॅकवरून येत होती. ती तिच्यापायांवरून गेली. रात्रभर रेल्वे येत जात होत्या. रुळांखालील उंदीर तिचे पाय, केस कुरतडत होते. रेल्वेतील मलमूत्र तिच्या चेहऱ्यावर, अंगावर पडत होतं. बऱ्याच वेळानंतर तिची शुद्ध हरपली.

एका प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला भरती करण्यात आलं आहे. हे तिला जाणवलं. सकाळी कोणालातरी ती ट्रॅकवर पडलेली, भेसूर अवस्था झालेली दिसली. 

तिचा पाय कापण्याचा निर्णय झाला. तिच्या समोर तिचं व्हॉलीबॉल करिअर संपताना तिला दिसत होतं.

“सर अपने पास क्लोरोफॉम नही है!” तिच्या कानी कोणाचेतरी शब्द पडलेत. लवकरात लवकर, विष पूढे जाण्यापूर्वी पाय कापणं गरजेचं होतं. तिने डॉक्टरांना स्वतः सांगितलं “मी रात्रभर इतक्या वेदना सहन केल्या आहेत की आता मी हे सुद्धा सहन करू शकते. तुम्ही क्लोरोफॉर्मशिवाय माझा पाय कापा..!”

तिचा पाय कापण्यात आला. क्लोरोफॉमशिवाय.त्याही वेदना सहन केल्या तिने. काय मानसिक अवस्था झाली असेल तिची त्या वेळी! शारीरिक वेदना तर सहन करण्यापलीकडे होत्या.

त्यानंतर तिला दिल्लीत एम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. या काळात मीडियाने अत्यंत नीच आरोप करत तिलाच दोषी ठरवू लागले. “अरुणिमाकडे तिकीट नव्हतं म्हणून तिनेच बाहेर उडी मारली” अश्या बातम्या वर्तमानपत्रात, न्यूज चॅनल्सवर आल्यात.

ती आतून तुटत होती..मरत होती. त्यावेळी तिने एम्स हॉस्पिटलमध्ये स्वतःपुढे एक विलक्षण एम ठेवलं. आयुष्यातील सगळ्यात मोठी खेळी खेळण्याचं ठरवलं!

तिने ठरवलं “माउंट एव्हरेस्ट” सर करण्याचं!

सगळयांनी तिला मूर्खात काढलं. अरुणिमा या अपघातामुळे ठार वेडी झालीये लोक म्हणू लागले.

सामान्य लोकांना, हिशोबी, सुरक्षित जगणाऱ्यांना हे माहिती नसतं की वेडे लोकच इतिहास घडवतात. क्रांती घडवतात. वेगळी पाऊलवाट तयार करतात. 

अरुणिमा सिन्हाला कृत्रिम पाय लावण्यात आला.
ती हॉस्पिटलमधून भावासोबत बच्चेंन्द्री पाल यांना बिहारमध्ये भेटायला गेली. बच्चेंन्द्री पाल” या प्रथम भारतीय स्त्री माउंट एव्हरेस्टवीर आहेत.

त्यांनीही तिला प्रथम विरोध केला. पण अरुणिमाची जिद्द बघून त्या म्हणाल्या ,” तू आधीच तुझ्या मनात एव्हरेस्ट सर केलंय! आता फक्त लोकांना ते दाखवायचं शिल्लक आहे!

त्यांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला. पण कर्म तर तिचं तिलाच करायचं होतं.

भारतात एकूण चार केंद्र सरकार आणि संरक्षण मांत्रालयाखाली येणारे पर्वतारोहन केंद्रे आहेत.

येथील प्रशिक्षण किती कडक आहे हे ट्रेकिंग ग्रुप्स सोबत मजा मस्ती करायला, सेल्फी काढायला जाणाऱ्या लोकांना कळू शकणार नाही.

या चारमध्येही सगळयात कडक आणि कठीण दोन केंद्रे, दार्जिलिंगचं आणि उत्तरकाशीचं जवाहरलाल नेहरू पर्वतारोहन केंद्र .

अरुणिमाची रवानगी उत्तर काशीच्या केंद्रात झाली. अत्यन्त कठीण ,कडक प्रशिक्षण सुरू झालं. चालताना ती सगळ्यांच्या मागे राहायची कारण मध्येच पाय मांडीतून निघून जायचा. तिला खूप उशीर होऊ लागला. ती तीन ते चार तास उशीर व्हायचा. पायातून रक्त यायचं. 

या केंद्रात एक नियम असतो, संध्याकाळी प्रशिक्षण आटोपल्यावर प्रत्येकाला स्वतःच्या पायाचे निरीक्षण करायला सांगितलं जातं. कारण पायाला बारीक फोड ज्यांना ‘ब्लिस्टर्स’ म्हणतात, ते आले असतील तर प्रशिक्षण बंद करायला सांगतात. कारण ते खूप धोक्याचं , सेप्टिक होण्याचा धोका आणि वेदनादायी असतं.
मी हा कोर्स केला असल्याने मला याची संपूर्ण जाणीव आहे.

अरुणीमा सिन्हाच्या पायातून तर रक्त येत होतं. ती सतत मांडीतून कृत्रिम पाय काढायची ,रक्त पुसून पुढे चालायची.

तिने दुसऱ्या दिवसापासून ठरवून टाकलं की काहीही होवो आता पाय काढून बघायचा नाही.
वेदना सहन करत चालत, हळूहळू तिची प्रगती होऊ लागली. जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर ती प्रथम येऊ लागली. सगळेजण थक्क झालेत तिच्या इच्छाशक्तीपुढे.

“अरुणिमा तुम क्या खाती हो?” विचारू लागलेत.

अरुणिमाचं एक महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झालं. परीक्षा A ग्रेडने पास झाली.
आता लक्ष होतं ‘एव्हरेस्ट’. या पृथ्वीवरील सगळ्यात उंच जागा! टॉप ऑफ द वर्ल्ड!

“टाटा स्टील”कडून तिला प्रायोजकत्व मिळाले. आणि अरुणिमा निघाली नेपाळकडे.

काठमांडुला पशुपतीनाथाचं दर्शन घेऊन दुसऱ्या दिवसापासून तिची चढाई सुरू झाली. शेर्पा तिच्या मदतीला होता. पण जेव्हा त्याला अरुणिमाच्या पायाबद्दल कळलं, त्याने एका अपंग मुलीसोबत जाण्यास नकार दिला. अरुणिमाने विनवण्या करून शेर्पाला राजी केले. ती म्हणाली तुम्हाला कुठेही जाणवणार नाही की तुम्ही एका अपंग मुलीसोबत चाललाय.

काही दिवसांच्या चालण्यानंतर , संकटं झेलत ,मृत्यूच्या दाढेतुन वाचत ती शिखरापासून काही मिनिटांवर येऊन पोहचली. रस्त्यात अनेक प्रेते दिसलीत. तेव्हा तिच्या समोर एक जर्मन पर्वतारोही पाय घासून मरताना दिसला.

एका ठिकाणी बर्फावर रक्त सांडलेलं दिसलं. पुनः काही प्रेते दिसलीत.
त्या सर्व प्रेतांना ओलांडून ती समोर गेली.
आणि शेवटी एव्हरेस्ट शिखर सर केलं..

एप्रिल 2011ला तिचा अपघात झाला आणि 21 मे 2013ला सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी ती पृथ्वीवरील सर्वात उंच जागेवर उभी होती. शी वॉज अॅक्च्युअली ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड.

पण…

पण अजूनही एक फार मोठं संकट बाकी होतं. तिचा प्राणवायू संपत आला होता. तिला जाणीव झाली होती की ती जिवंत परत जाऊ शकणार नाही.

म्हणून किमान जगाला आपला व्हिडीओ दिसावा म्हणून तिने शेर्पाला कॅमेराने तिला चित्रित करायला सांगितलं.

शेर्पा तिच्यावर प्रचंड चिडला. आणि मला तुझ्यासोबत मरायचं नाहीये असं म्हणाला. कारण परिस्थिती खूप बिकट होती. शिखरावर भयानक वेगाने वारे वाहत होते. लवकरच वादळ येणार होतं. आणि सगळ्यात मोठं संकट म्हणजे प्राणवायू संपत होता. पण तिची जिद्द बघून तो शेर्पाही नतमस्तक झाला. तो म्हणाला, “अरुणिमा आता मी मेलो तरीही चालेल पण तुला एकटं सोडणार नाही! तुला जिवंत परत खाली घेऊन जाईन!”

वेगाने ते परतीला निघालेत. पण तिचा कृत्रिम पाय सतत मांडीतून निखळत होता. त्यामुळे तिला चालताना खूप त्रास होत होता. पण तिची शर्यत लागली होती मृत्यूबरोबर! तोही वेगाने तिच्या मागे येत होता. तिला बाद करण्यासाठी. झडप घालण्यासाठी. 

तिच्या डोळ्यातुन अश्रू येत होते..उंच ठिकाणी चालताना तोंडात लाळ निर्माण होत असते. तिच्या तोंडातील लाळ खाली पडताना ‘टक’ असा आवाज येई, कारण खाली पडेपर्यंत त्याचा बर्फ होत होता. अश्रूही खाली ओघळताना बर्फ होत होते. 

तिचा हात काळा निळा पडला होता. फ्रॉस्ट बाईट, बर्फ बाधा म्हणतात. हातसुद्धा कापावा लागणार होता. पण ती जिवंत राहिली तर..
चालता येत नव्हतंच. 

शेवटी तिने एक भयंकर निर्णय घेतला, तिने पाय काढून टाकला..आणि तशीच स्वतःला घासत चालू लागली. एका हातात स्वतःचा एक पाय..काय दृश्य असेल ते! 

देव जगात असेल तर तो ही इतक्या उंचावर ,’जवळून’ तिला बघत असेल तर त्यानेही तोंडात बोट घातलं असेल! 

एव्हरेस्ट मोहिमे दरम्यान सगळ्यात जास्त मृत्यु हे परत येताना होत असतात. 
त्या क्षणी अरुणिमाकडे फक्त पाच मिनिटांचा प्राणवायू शिल्लक होता. दोघांनाही माहिती होतं आता तिचा मृत्यू अटळ.

आणि नेमका तेव्हा एक ब्रिटिश पर्वतवीर जास्तीचा प्राणवायू सिलेंडरसोबत दिसला. त्याला त्या सिलेंडरचं वजन होत असल्याने त्याने तो सिलेंडर तिथेच टाकून दिला. शेर्पा धावत तिथे गेला, सिलेंडर अर्ध भरलं होतं. त्याने ते प्राणवायूचं सिलेंडर आणून अरुणिमाच्या पाईपला जोडलं. अरुणिमाला पुनर्जीवन मिळाले.

अरुनिमा सिन्हाला 2015 मध्ये ‘पद्मश्री’ने गौरविण्यात आले.

मी आदल्या रात्री एका कार्यक्रमात प्रत्यक्ष अरुणिमा सिन्हाला ऐकून, बघून आलो होतो. तेव्हा मी मित्राला ओरडून म्हणालो , “ही आजच्या काळातील झाशीची राणी आहे!”

त्यावेळी संध्याकाळी मी झाशीच्या किल्ल्यासमोर होतो. खिडकीतून बघत होतो. पण डोळ्यासमोर राणी लक्ष्मीबाई येत नव्हती. दिसत होती ती आजच्या काळातील झाशीची राणी, एव्हरेस्टवीर, पद्मश्री अरुणिमा सिन्हा!

त्या काळात मी खूप नैराश्याने ग्रासलो होतो.
करिअरपासून सगळीकडेच नकारत्मक वाटत होतं.
पण अरुनिमा सिन्हाला ऐकल्यावर माझ्यात उत्साह संचारला. मी दररोज व्यायाम, सूर्यनमस्कार, आणि धावण्यास सुरवात केली. भीती दूर पळत गेली. इतकं कोणासोबत वाईट घडल्यावरही त्यातून एक व्यक्ती इतक्या पूढे जाऊ शकते तर मी तर धडधाकट आहे. कारण तिच्या इतक्या शारीरिक आणि मानसिक वेदना सहन केलेली मी तरी कोणी व्यक्ती आजवर बघितली नाही.

अरुणिमा सिन्हा हे जिवंत उदाहरण आहे सकारात्मकतेचं..जिद्दीचं..विलक्षण इच्छा शक्तीचं..

वाईट लोकांनी तिला अपंग केलं. तिने भारतातील कृत्रिम पायाने एव्हरेस्ट सर केलेली प्रथम व्यक्ती, हा इतिहास, रेकॉर्ड करून दाखवला. 

मी या जन्मात आधुनिक झांशीच्या राणीला बघितलं आहे. जेव्हा जेव्हा वेदना होतात मनाला तर अरुनिमा सिन्हा आठवते. कारण तिच्या मानसिक आणि शारीरिक वेदनांपुढे माझ्या वेदना मला तृणवत वाटू लागतात...
Writer unknown 
Copy paste

बुधवार, १२ मार्च, २०२५

भारताचा पॅरा जलतरणपटू सुयश नारायण जाधव याने हात नसतानाही आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकून देशाचा गौरव केला आहे. त्याचे समर्पण आणि जिद्द खरोखरच प्रेरणादायी आहे. मात्र, लोक त्यांच्यासारख्या खऱ्या हिरोपेक्षा रील डान्सर्सकडे जास्त लक्ष देतात हे दुर्दैव आहे. कितीही आव्हाने आली तरी मेहनत आणि जिद्द यातूनच खरे यश मिळते हे सुयशचा प्रवास सिद्ध करतो. 

त्याच्या अतुलनीय जिद्दीला सलाम...! तो अपंग असतानाही आपल्या कर्तृत्वाने भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याची कामगिरी विशेषतः पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये आणि इतर पॅरा जलतरण स्पर्धांमध्ये उल्लेखनीय आहे.  

त्याच्या यशाची काही ठळक वैशिष्ट्ये:

1. पॅरालिम्पिक कामगिरी : सुयशने पॅरालिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना देशासाठी पदक जिंकले आहे. त्याने जलतरणात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, विशेषतः बटरफ्लाय आणि इतर प्रकारांमध्ये.

2. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा : त्याने विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये अनेक सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके जिंकली आहेत.

3. प्रेरणादायी व्यक्तिमत्व : अपंगत्वाच्या मर्यादा ओलांडत सुयशने स्वतःचा मार्ग शोधला आहे, ज्यामुळे तो अनेकांसाठी प्रेरणास्थान बनला आहे.

सुयश जाधव हा केवळ एक खेळाडू नाही तर अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी आशेचा किरण आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. त्याच्या मेहनतीमुळे आणि जिद्दीमुळे त्याने स्वतःसाठी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Featured Post