सोमवार, २४ मार्च, २०२५

*फिरुनी नवे जन्मेन मी*
27 मार्च 2016ला केरळ एक्सप्रेसमध्ये दिल्लीहून सकाळी अकरा वाजता बसलो. आवडती साईड लोवर विंडो सीट मिळाली होती. गाडी झांशी शहराबाहेर काही मिनिटांसाठी थांबली. समोर उंचावर झांशीचा किल्ला खिडकीतून दृष्टीसमोर होता. खिडकीच्या बाहेर रुळांजवळ छोटंसं तळं होतं. सूर्यास्त व्हायला पाऊण एक तास बाकी असेल. सूर्य झांशीच्या किल्ल्याच्या मागे दडत होता. त्या पिवळ्या केशरी प्रकाशात, ग पाण्याच्या मागे किल्ला अंधारात राकट काळा दिसत होता.

त्या दिवशी वर्ल्डकपमधील सेमी फायनल , भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया डू ऑर डाय मॅच होती. एरवी मी मॅचचे अपडेट्स घेत बसलो असतो. पण माझ्या डोक्यात तेव्हा वेगळे विचार सुरू होते.

इतर कोणत्याही दिवशी समोर किल्ला दिसत असता तर मी मनाने, कल्पनेने राणी लक्ष्मीबाईने किल्ल्यावरून कशी अश्वउडी घेतली असेल याची कल्पना मी करत राहिलो असतो. पण त्या दिवशी झांशीच्या किल्ल्याकडे बघताना एका वेगळ्याच ‘व्यक्तीची’ आठवण मला येत होती. त्याच व्यक्तिबद्दल माझ्या मनात आदल्या दिवशीपासून विचार सुरू होते. मित्राला 'त्या' व्यक्तीबद्दल एक वाक्य ही बोललो होतो..आणि काय आश्चर्य डोळ्यासमोर तेव्हा झांशीचा किल्ला होता. गाडी थांबलेलीच होती.

डोळ्यासमोर व्यक्ती येत होती ती “अरुणिमा सिन्हा”.

23 वर्षाची ही नॅशनल व्हॉलीबॉल खेळाडू मुलगी 12 एप्रिल 2011ला घरून दिल्लीला नोकरीच्या मुलखतीसाठी निघाली. सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन घरातून निघताना तिच्या घरच्यांना किंवा तिलाही कल्पना नव्हती नियतीने तिच्यापुढे काय वाढून ठेवलंय.

लखनऊहुन ती पद्मावती एक्सप्रेसमध्ये जनरल डब्यात चढली. रात्री डब्यात काही तरुण हातात चाकू घेऊन डब्यात घुसले. सगळयांना धमकावून जे मिळेल ते लुटू लागले. कोणत्याही प्रवाशाने विरोध केला नाही.

तिच्या गळ्यात सोन्याची चेन होती.
ते दरोडेखोर तिच्याजवळ आलेत. एकाने तिला चेन देण्यासाठी दरडावले. दुसरा तिच्या गळ्यापाशी हात नेऊ लागला.

तीने विरोध केला. ती म्हणाली ,”मैं अपनी चेन नही दुंगी!”

ती विरोध करू लागली. एकाने तिच्या पोटावर लाथ मारली. तिच्या गळ्यातील चेन ओढून घेतली. पण ते पिसाळले होते. कोणीही विरोध करत नसताना एक मुलगी आपल्याला विरोध करतेय हे त्यांना पचलं नाही. ट्रेन भरधाव सुरू होती. त्या नीच उलट्या काळजाच्या लोकांनी तिला ओढत दरवाज्यापाशी नेले आणि भरधाव वेगातील रेल्वेतुन बाहेर ढकलून दिले.

रात्रीची वेळ..ती जोराने आदळली. कंबरेपासून पायाचे हाड मोडलेत. चेहऱ्यावर जखमा..ती जिथे आदळली त्याला लागून दुसरा रेल्वेमार्ग होता. दुसऱ्या ट्रॅकवरील रुळांवर तिचा पाय होता. तिने उठायचा प्रयत्न केला. पण ती उठू शकली नाही. पाय हलत नव्हता. समोरून एक रेल्वे त्याच ट्रॅकवरून येत होती. ती तिच्यापायांवरून गेली. रात्रभर रेल्वे येत जात होत्या. रुळांखालील उंदीर तिचे पाय, केस कुरतडत होते. रेल्वेतील मलमूत्र तिच्या चेहऱ्यावर, अंगावर पडत होतं. बऱ्याच वेळानंतर तिची शुद्ध हरपली.

एका प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला भरती करण्यात आलं आहे. हे तिला जाणवलं. सकाळी कोणालातरी ती ट्रॅकवर पडलेली, भेसूर अवस्था झालेली दिसली. 

तिचा पाय कापण्याचा निर्णय झाला. तिच्या समोर तिचं व्हॉलीबॉल करिअर संपताना तिला दिसत होतं.

“सर अपने पास क्लोरोफॉम नही है!” तिच्या कानी कोणाचेतरी शब्द पडलेत. लवकरात लवकर, विष पूढे जाण्यापूर्वी पाय कापणं गरजेचं होतं. तिने डॉक्टरांना स्वतः सांगितलं “मी रात्रभर इतक्या वेदना सहन केल्या आहेत की आता मी हे सुद्धा सहन करू शकते. तुम्ही क्लोरोफॉर्मशिवाय माझा पाय कापा..!”

तिचा पाय कापण्यात आला. क्लोरोफॉमशिवाय.त्याही वेदना सहन केल्या तिने. काय मानसिक अवस्था झाली असेल तिची त्या वेळी! शारीरिक वेदना तर सहन करण्यापलीकडे होत्या.

त्यानंतर तिला दिल्लीत एम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. या काळात मीडियाने अत्यंत नीच आरोप करत तिलाच दोषी ठरवू लागले. “अरुणिमाकडे तिकीट नव्हतं म्हणून तिनेच बाहेर उडी मारली” अश्या बातम्या वर्तमानपत्रात, न्यूज चॅनल्सवर आल्यात.

ती आतून तुटत होती..मरत होती. त्यावेळी तिने एम्स हॉस्पिटलमध्ये स्वतःपुढे एक विलक्षण एम ठेवलं. आयुष्यातील सगळ्यात मोठी खेळी खेळण्याचं ठरवलं!

तिने ठरवलं “माउंट एव्हरेस्ट” सर करण्याचं!

सगळयांनी तिला मूर्खात काढलं. अरुणिमा या अपघातामुळे ठार वेडी झालीये लोक म्हणू लागले.

सामान्य लोकांना, हिशोबी, सुरक्षित जगणाऱ्यांना हे माहिती नसतं की वेडे लोकच इतिहास घडवतात. क्रांती घडवतात. वेगळी पाऊलवाट तयार करतात. 

अरुणिमा सिन्हाला कृत्रिम पाय लावण्यात आला.
ती हॉस्पिटलमधून भावासोबत बच्चेंन्द्री पाल यांना बिहारमध्ये भेटायला गेली. बच्चेंन्द्री पाल” या प्रथम भारतीय स्त्री माउंट एव्हरेस्टवीर आहेत.

त्यांनीही तिला प्रथम विरोध केला. पण अरुणिमाची जिद्द बघून त्या म्हणाल्या ,” तू आधीच तुझ्या मनात एव्हरेस्ट सर केलंय! आता फक्त लोकांना ते दाखवायचं शिल्लक आहे!

त्यांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला. पण कर्म तर तिचं तिलाच करायचं होतं.

भारतात एकूण चार केंद्र सरकार आणि संरक्षण मांत्रालयाखाली येणारे पर्वतारोहन केंद्रे आहेत.

येथील प्रशिक्षण किती कडक आहे हे ट्रेकिंग ग्रुप्स सोबत मजा मस्ती करायला, सेल्फी काढायला जाणाऱ्या लोकांना कळू शकणार नाही.

या चारमध्येही सगळयात कडक आणि कठीण दोन केंद्रे, दार्जिलिंगचं आणि उत्तरकाशीचं जवाहरलाल नेहरू पर्वतारोहन केंद्र .

अरुणिमाची रवानगी उत्तर काशीच्या केंद्रात झाली. अत्यन्त कठीण ,कडक प्रशिक्षण सुरू झालं. चालताना ती सगळ्यांच्या मागे राहायची कारण मध्येच पाय मांडीतून निघून जायचा. तिला खूप उशीर होऊ लागला. ती तीन ते चार तास उशीर व्हायचा. पायातून रक्त यायचं. 

या केंद्रात एक नियम असतो, संध्याकाळी प्रशिक्षण आटोपल्यावर प्रत्येकाला स्वतःच्या पायाचे निरीक्षण करायला सांगितलं जातं. कारण पायाला बारीक फोड ज्यांना ‘ब्लिस्टर्स’ म्हणतात, ते आले असतील तर प्रशिक्षण बंद करायला सांगतात. कारण ते खूप धोक्याचं , सेप्टिक होण्याचा धोका आणि वेदनादायी असतं.
मी हा कोर्स केला असल्याने मला याची संपूर्ण जाणीव आहे.

अरुणीमा सिन्हाच्या पायातून तर रक्त येत होतं. ती सतत मांडीतून कृत्रिम पाय काढायची ,रक्त पुसून पुढे चालायची.

तिने दुसऱ्या दिवसापासून ठरवून टाकलं की काहीही होवो आता पाय काढून बघायचा नाही.
वेदना सहन करत चालत, हळूहळू तिची प्रगती होऊ लागली. जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर ती प्रथम येऊ लागली. सगळेजण थक्क झालेत तिच्या इच्छाशक्तीपुढे.

“अरुणिमा तुम क्या खाती हो?” विचारू लागलेत.

अरुणिमाचं एक महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झालं. परीक्षा A ग्रेडने पास झाली.
आता लक्ष होतं ‘एव्हरेस्ट’. या पृथ्वीवरील सगळ्यात उंच जागा! टॉप ऑफ द वर्ल्ड!

“टाटा स्टील”कडून तिला प्रायोजकत्व मिळाले. आणि अरुणिमा निघाली नेपाळकडे.

काठमांडुला पशुपतीनाथाचं दर्शन घेऊन दुसऱ्या दिवसापासून तिची चढाई सुरू झाली. शेर्पा तिच्या मदतीला होता. पण जेव्हा त्याला अरुणिमाच्या पायाबद्दल कळलं, त्याने एका अपंग मुलीसोबत जाण्यास नकार दिला. अरुणिमाने विनवण्या करून शेर्पाला राजी केले. ती म्हणाली तुम्हाला कुठेही जाणवणार नाही की तुम्ही एका अपंग मुलीसोबत चाललाय.

काही दिवसांच्या चालण्यानंतर , संकटं झेलत ,मृत्यूच्या दाढेतुन वाचत ती शिखरापासून काही मिनिटांवर येऊन पोहचली. रस्त्यात अनेक प्रेते दिसलीत. तेव्हा तिच्या समोर एक जर्मन पर्वतारोही पाय घासून मरताना दिसला.

एका ठिकाणी बर्फावर रक्त सांडलेलं दिसलं. पुनः काही प्रेते दिसलीत.
त्या सर्व प्रेतांना ओलांडून ती समोर गेली.
आणि शेवटी एव्हरेस्ट शिखर सर केलं..

एप्रिल 2011ला तिचा अपघात झाला आणि 21 मे 2013ला सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी ती पृथ्वीवरील सर्वात उंच जागेवर उभी होती. शी वॉज अॅक्च्युअली ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड.

पण…

पण अजूनही एक फार मोठं संकट बाकी होतं. तिचा प्राणवायू संपत आला होता. तिला जाणीव झाली होती की ती जिवंत परत जाऊ शकणार नाही.

म्हणून किमान जगाला आपला व्हिडीओ दिसावा म्हणून तिने शेर्पाला कॅमेराने तिला चित्रित करायला सांगितलं.

शेर्पा तिच्यावर प्रचंड चिडला. आणि मला तुझ्यासोबत मरायचं नाहीये असं म्हणाला. कारण परिस्थिती खूप बिकट होती. शिखरावर भयानक वेगाने वारे वाहत होते. लवकरच वादळ येणार होतं. आणि सगळ्यात मोठं संकट म्हणजे प्राणवायू संपत होता. पण तिची जिद्द बघून तो शेर्पाही नतमस्तक झाला. तो म्हणाला, “अरुणिमा आता मी मेलो तरीही चालेल पण तुला एकटं सोडणार नाही! तुला जिवंत परत खाली घेऊन जाईन!”

वेगाने ते परतीला निघालेत. पण तिचा कृत्रिम पाय सतत मांडीतून निखळत होता. त्यामुळे तिला चालताना खूप त्रास होत होता. पण तिची शर्यत लागली होती मृत्यूबरोबर! तोही वेगाने तिच्या मागे येत होता. तिला बाद करण्यासाठी. झडप घालण्यासाठी. 

तिच्या डोळ्यातुन अश्रू येत होते..उंच ठिकाणी चालताना तोंडात लाळ निर्माण होत असते. तिच्या तोंडातील लाळ खाली पडताना ‘टक’ असा आवाज येई, कारण खाली पडेपर्यंत त्याचा बर्फ होत होता. अश्रूही खाली ओघळताना बर्फ होत होते. 

तिचा हात काळा निळा पडला होता. फ्रॉस्ट बाईट, बर्फ बाधा म्हणतात. हातसुद्धा कापावा लागणार होता. पण ती जिवंत राहिली तर..
चालता येत नव्हतंच. 

शेवटी तिने एक भयंकर निर्णय घेतला, तिने पाय काढून टाकला..आणि तशीच स्वतःला घासत चालू लागली. एका हातात स्वतःचा एक पाय..काय दृश्य असेल ते! 

देव जगात असेल तर तो ही इतक्या उंचावर ,’जवळून’ तिला बघत असेल तर त्यानेही तोंडात बोट घातलं असेल! 

एव्हरेस्ट मोहिमे दरम्यान सगळ्यात जास्त मृत्यु हे परत येताना होत असतात. 
त्या क्षणी अरुणिमाकडे फक्त पाच मिनिटांचा प्राणवायू शिल्लक होता. दोघांनाही माहिती होतं आता तिचा मृत्यू अटळ.

आणि नेमका तेव्हा एक ब्रिटिश पर्वतवीर जास्तीचा प्राणवायू सिलेंडरसोबत दिसला. त्याला त्या सिलेंडरचं वजन होत असल्याने त्याने तो सिलेंडर तिथेच टाकून दिला. शेर्पा धावत तिथे गेला, सिलेंडर अर्ध भरलं होतं. त्याने ते प्राणवायूचं सिलेंडर आणून अरुणिमाच्या पाईपला जोडलं. अरुणिमाला पुनर्जीवन मिळाले.

अरुनिमा सिन्हाला 2015 मध्ये ‘पद्मश्री’ने गौरविण्यात आले.

मी आदल्या रात्री एका कार्यक्रमात प्रत्यक्ष अरुणिमा सिन्हाला ऐकून, बघून आलो होतो. तेव्हा मी मित्राला ओरडून म्हणालो , “ही आजच्या काळातील झाशीची राणी आहे!”

त्यावेळी संध्याकाळी मी झाशीच्या किल्ल्यासमोर होतो. खिडकीतून बघत होतो. पण डोळ्यासमोर राणी लक्ष्मीबाई येत नव्हती. दिसत होती ती आजच्या काळातील झाशीची राणी, एव्हरेस्टवीर, पद्मश्री अरुणिमा सिन्हा!

त्या काळात मी खूप नैराश्याने ग्रासलो होतो.
करिअरपासून सगळीकडेच नकारत्मक वाटत होतं.
पण अरुनिमा सिन्हाला ऐकल्यावर माझ्यात उत्साह संचारला. मी दररोज व्यायाम, सूर्यनमस्कार, आणि धावण्यास सुरवात केली. भीती दूर पळत गेली. इतकं कोणासोबत वाईट घडल्यावरही त्यातून एक व्यक्ती इतक्या पूढे जाऊ शकते तर मी तर धडधाकट आहे. कारण तिच्या इतक्या शारीरिक आणि मानसिक वेदना सहन केलेली मी तरी कोणी व्यक्ती आजवर बघितली नाही.

अरुणिमा सिन्हा हे जिवंत उदाहरण आहे सकारात्मकतेचं..जिद्दीचं..विलक्षण इच्छा शक्तीचं..

वाईट लोकांनी तिला अपंग केलं. तिने भारतातील कृत्रिम पायाने एव्हरेस्ट सर केलेली प्रथम व्यक्ती, हा इतिहास, रेकॉर्ड करून दाखवला. 

मी या जन्मात आधुनिक झांशीच्या राणीला बघितलं आहे. जेव्हा जेव्हा वेदना होतात मनाला तर अरुनिमा सिन्हा आठवते. कारण तिच्या मानसिक आणि शारीरिक वेदनांपुढे माझ्या वेदना मला तृणवत वाटू लागतात...
Writer unknown 
Copy paste

बुधवार, १२ मार्च, २०२५

भारताचा पॅरा जलतरणपटू सुयश नारायण जाधव याने हात नसतानाही आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकून देशाचा गौरव केला आहे. त्याचे समर्पण आणि जिद्द खरोखरच प्रेरणादायी आहे. मात्र, लोक त्यांच्यासारख्या खऱ्या हिरोपेक्षा रील डान्सर्सकडे जास्त लक्ष देतात हे दुर्दैव आहे. कितीही आव्हाने आली तरी मेहनत आणि जिद्द यातूनच खरे यश मिळते हे सुयशचा प्रवास सिद्ध करतो. 

त्याच्या अतुलनीय जिद्दीला सलाम...! तो अपंग असतानाही आपल्या कर्तृत्वाने भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याची कामगिरी विशेषतः पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये आणि इतर पॅरा जलतरण स्पर्धांमध्ये उल्लेखनीय आहे.  

त्याच्या यशाची काही ठळक वैशिष्ट्ये:

1. पॅरालिम्पिक कामगिरी : सुयशने पॅरालिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना देशासाठी पदक जिंकले आहे. त्याने जलतरणात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, विशेषतः बटरफ्लाय आणि इतर प्रकारांमध्ये.

2. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा : त्याने विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये अनेक सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके जिंकली आहेत.

3. प्रेरणादायी व्यक्तिमत्व : अपंगत्वाच्या मर्यादा ओलांडत सुयशने स्वतःचा मार्ग शोधला आहे, ज्यामुळे तो अनेकांसाठी प्रेरणास्थान बनला आहे.

सुयश जाधव हा केवळ एक खेळाडू नाही तर अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी आशेचा किरण आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. त्याच्या मेहनतीमुळे आणि जिद्दीमुळे त्याने स्वतःसाठी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मंगळवार, ४ मार्च, २०२५

जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर: एक महान कृषी क्षेत्र..विज्ञान, शेती आणि मानवतेसाठी आदर्श जीवन

जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर: एक महान कृषी शास्त्रज्ञ..विज्ञान, शेती आणि मानवतेसाठी समर्पित जीवन...
(आधुनिक शेती तंत्रज्ञान )
जन्म: सुमारे 1864, डायमंड, मिसूरी, अमेरिका
मृत्यू: 5 जानेवारी 1943, टस्केगी, अलाबामा
व्यवसाय: कृषीशास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षक, मानवतावादी
प्रसिद्धीस कारणीभूत: शेंगदाणे, गोड बटाटे, माती संवर्धन यावर संशोधन

जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेले.
लहानपण आणि शिक्षण:
जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा जन्म अंदाजे 1864 मध्ये मिसूरी राज्यातील डायमंड येथे एका गुलाम कुटुंबात झाला. त्यांच्या जन्माची नेमकी तारीख ज्ञात नाही.
ते जन्मतःच गुलाम होते, कारण त्यावेळी अमेरिकेत गुलामगिरी अस्तित्वात होती.
लहानपणीच त्यांचे आई-वडील निधन झाले किंवा त्यांना पळवून नेले गेले. त्यामुळे त्यांचा सांभाळ त्यांचे माजी मालक मोजेस कार्व्हर आणि त्यांची पत्नी सुसान यांनी केला.

शिक्षणासाठी संघर्ष:
बालपणातच जॉर्ज यांना शिक्षणाची तीव्र इच्छा होती, पण त्या काळात कृष्णवर्णीय मुलांसाठी शिक्षणाच्या संधी फारच मर्यादित होत्या.
जवळच्या पांढऱ्या/ गोऱ्या लोकांसाठी असलेल्या शाळेत त्यांना प्रवेश मिळत नव्हता, त्यामुळे त्यांनी स्वतःच अभ्यास करायला सुरुवात केली.

शिक्षण मिळवण्यासाठी त्यांनी लहानपणीच घर सोडले आणि वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन शिकण्याचा प्रयत्न केला.
शेवटी त्यांनी मिन्डेन, कॅन्सस येथील शाळेत प्रवेश मिळवला.

शिक्षण चालू ठेवण्यासाठी त्यांनी विविध प्रकारची कामे केली, जसे की कपडे धुणे, स्वयंपाक करणे आणि बागकाम. लहानपणी जॉर्ज अशक्त होते. ताप आणि सर्दी-खोकल्याने ते परेशन असत. त्यामुळे त्यांना घराबाहेर फारसे जाऊ दिले जात नसे. परसबागेत जॉर्ज कार्व्हर हे मदत करत असे. त्यातून जॉर्जना यांना वनस्पतींची आवड निर्माण झाली. वनस्पती आणि प्राण्यांची चित्रे काढणे, रंगवणे ते त्यांना खूप आवडायचे. रोपे लावणे, झाडे वाढवणे, पोषक माती तयार करणे अशा शेतकामांत ते तरबेज होते. याखेरीज नैसर्गिक कीटकनाशके, कृमीनाशके, कवकनाशके बनवून वापरण्यातील कौशल्यामुळेही लोक त्याना ‘वनस्पतीं’चा डॉक्टर म्हणू लागले. आधुनिक शेती तंत्रज्ञान या पेज ल लाईक फॉलो करा..आसपासचे लोक बाल जॉर्जना, स्वतःकडच्या झाडाझुडपांबद्दल सल्ला विचारीत.

शालेय जीवन आणि पुढील शिक्षण:
शिक्षणाची आवड असल्यामुळे त्यांनी आयोवा स्टेट अॅग्रिकल्चरल कॉलेज (आताचे आयोवा स्टेट युनिव्हर्सिटी) मध्ये प्रवेश घेतला आणि कृषीशास्त्र व वनस्पतीशास्त्रात विशेष प्राविण्य मिळवले.

त्यानंतर त्यांनी टस्केगी इन्स्टिट्यूटमध्ये (आताचे टस्केगी युनिव्हर्सिटी) प्राध्यापक म्हणून काम केले आणि कृषी संशोधनाला वाहून घेतले.

लहानपणाचा प्रभाव:
कार्व्हर यांनी बालपणातील संघर्षांमुळे कठीण परिस्थितीशी झगडण्याची ताकद आणि आत्मनिर्भरता मिळवली. त्यांची जिज्ञासा आणि चिकाटी यामुळे ते एका गरीब गुलामाच्या मुलापासून एक प्रसिद्ध वैज्ञानिक आणि शिक्षक बनले.

 1. टस्केगी इन्स्टिट्यूटमधील कार्य

1896 मध्ये कार्व्हर यांना टस्केगी इन्स्टिट्यूट (आताचे टस्केगी युनिव्हर्सिटी) मध्ये शिक्षण आणि संशोधन करण्याची संधी मिळाली. त्यांनी येथे 47 वर्षे काम केले आणि हजारो गरीब शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती, माती संवर्धन आणि पर्यावरणपूरक शेती तंत्रज्ञान शिकवले.
. शेंगदाणे आणि गोड बटाट्याचे संशोधन
शेंगदाण्याचा उपयोग:

लोक सहसा समजतात की कार्व्हर यांनी शेंगदाणेवर आधारित "शेंगदाणे बटर" (Peanut Butter) शोधून काढले, पण ही वस्तुस्थिती अर्धवट खरी आहे. अमेरिकेत त्याआधीही शेंगदाणे बटर बनवले जात होते. मात्र, कार्व्हर यांनी शेंगदाण्याचा 300 हून अधिक प्रकारे उपयोग शोधला, जसे की:
*शेंगदाणे तेल, सौंदर्यप्रसाधने (लोशन, साबण), शाई आणि रंग
*चिकट पदार्थ, औषधे, 
गोड बटाट्याचा उपयोग:
कार्व्हर यांनी गोड बटाट्याचा 100 हून अधिक उपयोग शोधला, जसे की: पीठ, रबर,कागद, मद्य, चिकट पदार्थ

त्यांनी केलेल्या संशोधनामुळे दक्षिणेकडील अमेरिकेतील शेतकऱ्यांना कापसावर अवलंबून न राहता विविध पीक घेतल्यास जमिनीचा पोत सुधारेल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, हे समजले.

४. मृदा संवर्धन आणि पीक परिपथ (Crop Rotation)

त्या काळात अमेरिकन दक्षिण भागातील शेतकरी सतत कापसाचे उत्पादन घेत असल्याने जमिनीची सुपीकता कमी होत होती. कार्व्हर यांनी "पीक परिपथ" (Crop Rotation) प्रणाली विकसित केली. यात त्यांनी असे सुचवले की,

एकाच जमिनीत वारंवार कापूस न लावता वर्षभरात शेंगदाणे, गोड बटाटे आणि इतर पिके घेतल्यास जमिनीतील नायट्रोजन वाढतो आणि सुपीकता टिकून राहते. या पद्धतीमुळे दक्षिणेकडील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आणि पर्यावरणाला मोठा फायदा झाला.

५. पुरस्कार आणि सन्मान
कार्व्हर यांनी संपूर्ण आयुष्य हे लोकहितासाठी व्यतीत केले आणि आपले संशोधन गरीब शेतकऱ्यांसाठी मोफत उपलब्ध करून दिले. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक सन्मान मिळाले:
1906: अमेरिकन काँग्रेससमोर साक्ष देणारे पहिले कृष्णवर्णीय वैज्ञानिक

1921: शेंगदाण्याच्या उपयोगांविषयी अमेरिकन काँग्रेससमोर भाषण दिले

1923: स्प्रिंगार मेडल (Springarn Medal) – आफ्रिकन-अमेरिकन लोकांसाठी दिला जाणारा प्रतिष्ठित पुरस्कार

1939: फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांनी त्यांना "Roosevelt Medal for Outstanding Contribution to Southern Agriculture" प्रदान केले

1941: "Time" मासिकाने त्यांना "Black Leonardo" (कृष्णवर्णीय लिओनार्डो दा विंची) असे नाव दिले

६. मृत्यू आणि वारसा

5 जानेवारी 1943 रोजी, 78 वर्षांच्या वयात, टस्केगी, अलाबामा येथे त्यांचे निधन झाले. अमेरिकेच्या सरकारने त्यांना गौरवण्याकरिता त्यांच्या सन्मानार्थ पोस्टल स्टॅम्प आणि नॅशनल मोन्युमेंट उभारले.

७. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांची शिकवण

त्यांनी संपूर्ण आयुष्य साधेपणाने आणि नि:स्वार्थ भावनेने व्यतीत केले. त्यांचे हे वचन प्रसिद्ध आहे:

"शिक्षण म्हणजे केवळ ज्ञान मिळवणे नव्हे, तर त्याचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी करणे."

त्यांनी आपले संशोधन कधीही व्यावसायिकरित्या पेटंट केले नाही कारण त्यांना शेतकऱ्यांना मदत करायची होती, नफा कमवायचा नव्हता.

जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी अमेरिकन शेतीत क्रांती घडवून आणली.

त्यांच्याविषयी मराठीत एक प्रसिद्ध पुस्तक आहे जे की सर्वांनीच वाचले पाहिजे..
'एक होता कार्व्हर' हे वीणा गवाणकर लिखित मराठी पुस्तक आहे, जे अमेरिकन कृषितज्ज्ञ आणि वैज्ञानिक जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या जीवनावर आधारित आहे. हे पुस्तक त्यांच्या कठीण परिस्थितीतून यशस्वी होण्याच्या जिद्दीची प्रेरणादायी कथा सांगते. 

त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग कृषीशास्त्र आणि संशोधनासाठी केला, ज्यामुळे अमेरिकेतील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला.

Featured Post